यजमान न्यूझीलंडची विजयी सलामी

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी  – दि. २३ – डेव्हॉन कॉनवेने अवघ्या 59 चेंडूत नाबाद 99 धावांची आतषबाजी केल्यानंतर पहिल्या टी-20 सामन्यात यजमान न्यूझीलंडने ऑस्ट्रेलिया संघावर 53 धावांनी सहज मात केली आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकात 5 बाद 184 धावा केल्या तर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला 17.3 षटकात सर्वबाद 131 धावांवरच आटोपते घ्यावे लागले. डेव्हॉन अर्थातच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

दक्षिण आफ्रिकेतील जन्म असलेल्या डेव्हॉन कॉनवेची यापूर्वी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या 65 इतकी होती. ती त्याने मागे टाकली. वास्तविक, तो फलंदाजीला उतरला, त्यावेळी न्यूझीलंडची 2 बाद 11 अशी दैना उडाली होती. मात्र, त्याने लवकरच जम बसवला आणि अखेरपर्यंत तो नाबाद राहिला. न्यूझीलंडने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

विजयासाठी 185 धावांच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाची देखील खराब सुरुवात झाली. पहिल्याच षटकात कर्णधार ऍरॉन फिंच व जोश फिलीप बाद झाले आणि ऑस्ट्रेलियाची 2 बाद 8 अशी दाणादाण उडाली. विशेष म्हणजे या उभयतांचेही झेल 99 धावा जमवणाऱया कॉनवेने टिपले. न्यूझीलंडची नव्या चेंडूवरील जोडी टीम साऊदी व ट्रेंट बोल्ट यांनी हॅग्ले ओव्हलवरील या सामन्यात फ्लडलाईट्सवर स्विंग करण्यात कमालीचे यश प्राप्त केले. मॅथ्यू वेड बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची 3 बाद 16 अशी आणखी बिकट स्थिती झाली. मॅक्सवेलला नीशमने बाद केले, त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ 4 बाद 19 असा आणखी अडचणीत सापडला.

ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क दक्षिण आफ्रिका दौऱयावर असतील, असे गृहित धरत त्यांना या मालिकेतून विश्रांती दिली. पण, हा दौराच आता रद्द झाला आहे.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड ः 20 षटकात 5 बाद 184 ः डेव्हॉन कॉनवे 59 चेंडूत 10 चौकार, 3 षटकारासह नाबाद 99, ग्लेन फिलीप्स 34 चेंडूत 3 षटकारांसह 30, जेम्स नीशम 15 चेंडूत 3 चौकारांसह 26, केन विल्यम्सन 12. अवांतर 9. डॅनिएल सॅम्स 2-40, झाय रिचर्डसन 2-31, स्टोईनिस 1-17).

ऑस्ट्रेलिया ः 17.3 षटकात सर्वबाद 131 ः मिशेल मार्श 33 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 45, मॅथ्यू वेड 12 चेंडूत 1 षटकारासह 12, ऍडम झाम्पा 8 चेंडूत नाबाद 13. अवांतर 9. ईश सोधी 4-28, टीम साऊदी 2-10, ट्रेंट बोल्ट 2-22, जेमिसन-सॅन्टनर प्रत्येकी 1 बळी).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *