‘या’ अटी व शर्तीसह शिर्डीचे साईमंदिर खुलेच राहणार,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – शिर्डी – दि. २३ – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने निर्बंध कडक करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही ठिकाणची मंदीरे पुन्हा बंद करण्यात आली आहेत. मात्र, शिर्डीचे साईमंदीर खुलेच ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. असे असले तरी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. आगाऊ बुकिंगशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश मिळणार नाही. मास्कची सक्ती आणि पूजा साहित्य मंदिरात नेण्यास बंदी करण्यात आली आहे.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी मंदीर खुले करतानाच अनेक नियम करण्यात आले होते. मधल्या काळात त्यामध्ये शिथीलता येत होती. आता मंदीर बंद करण्याची वेळ येऊ नये, यासाठी या नियमांची काटेकोर अमंलबजावणी करण्यात येणार आहे. दररोज सुमारे पंधरा हजार भाविकांना दर्शनाची सोय करून देण्यात आली आहे. याचे नियोजन करता यावे यासाठी ऑनलाइन दर्शनपास पद्दत सुरू करण्यात आलेली आहे. असे पास असल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे भाविकांनी शिर्डीत येण्यापूर्वी ऑनलाईन दर्शनपास घेऊनच यावे, असे आवाहन साईबाबा संस्‍थानतर्फे करण्‍यात आलेले आहे.

संस्थानच्यावतीने सांगण्यात आले की, राज्‍य शासनाच्‍या आदेशानुसार १६ नोव्‍हेंबर २०२० पासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी काही अटी, शर्तींवर खुले करण्‍यात आलेले आहे. अदयाप करोनाचे सावट संपलेले नाही. सध्‍या करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्व साईभक्‍तांनी आपल्‍या आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने काळजी घेणे आवश्‍यक आहे. दर्शनाकरीता ठराविक संख्‍येनेच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिरात गर्दी होऊ नये म्‍हणून सलग दोन किंवा जास्‍त दिवस सलग सुट्टी आल्याच्या काळात, तसेच गुरुवार, शनिवार, रविवार व सरकारी सुट्टी अथवा महत्‍वाचे धार्म‍िक दिवशी ऑनलाइन पास सक्तीचे आहेत. या काळात येताना भाविकांनी संस्थानच्या online.sai.org.in या संकेतस्‍थळावरुन आगाऊ ऑनलाईन दर्शनपास घेऊनच यावे. पास निश्चित झाल्‍यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे. या वेबसाईटव्‍दारे सशुल्‍क दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्‍याचे तारखेपासून पुढील पाच दिवसांसाठी तसेच मोफत दर्शनपास नियोजित दर्शन तारखेची आरक्षण सुविधा आरक्षण केल्‍याचे तारखेपासून पुढील दोन दिवसांसाठी उपलब्‍ध असेल, असेही संस्थानतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *