महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २३ – राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाउन होणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला सतावू लागला आहे. कोरोनासंबंधी नियमांचे नागरिकांकडून योग्य पालन होत नसल्यामुळे कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढत असल्याचे सांगितले जात आहे. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल असा अल्टिमेटम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आज महत्वाची बैठक बोलावली आहे.
आज मुंबई महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांची मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे मुंबईतील स्थितीचा आढावा घेणार आहेत. सोमवारपासून काही दिवसांसाठी राज्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.