महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – वाशीम – दि. २५- पोहरादेवी येथील एका महंतांसह कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच गावातील इतर 3 मिळून एकूण 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पोहरादेवी येथे वनमंत्री संजय राठोड यांनी नुकतेच शक्तीप्रदर्शन केले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते.
टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड 23 फेब्रुवारी रोजी बंजारा समाजाची काशी पोहरागडावर प्रकटले होते. या ठिकाणी त्यांच्या हजारो समर्थकांकडून करण्यात आलेल्या शक्तीप्रदर्शनात जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला पायदळी तुडविण्यात आल्याने कायदा केवळ सर्वसामान्यांसाठी आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आता येथे कोरोनाचा उद्रेक झाला आहे.
संजय राठोड हे 23 फेब्रुवारी रोजी सपत्नीक आई जगदंबा, सेवालाल महाराज व रामराव महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले होते. यावेळी राठोड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळविताना पोलीस प्रशासनाच्या नाकीनऊ आल्याचेही दिसून आले.