महाराष्ट्र 24। विशेष प्रतिनिधी । दि.२६। पिंपरी चिंचवड ।कोव्हीड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र विद्यार्थ्यांकडून जबरदस्ती फीसाठी तगादा लावला जात आहे. परिणामी पालकवर्गांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पिंपरी, वल्लभनगर येथील डीवाय पाटील कला, वाणिज्य, शास्त्र महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांकडे फि वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमिवर पालक सध्या विविध समस्यांना तोंड देत आहेत. त्यात महाविद्यालयांकडून केली जाणारी सक्ती अयोग्य आहे. याविरोधात छावा संघटनेकडून तीव्र विरोध करण्यात येत असून, महाविद्यालय प्रशासनाविरोधात धडक आंदोलन छेडण्याचा इशारा छावा संघटनेचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सौरभ सगर यांनी दिला आहे. येत्या सोमवारी दिनांक 1 मार्च रोजी डीवाय पाटील महाविद्यालय प्रशासनाला याचा जाब विचारण्यासाठी छावा स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी डीवाय पाटील प्रशासनाची भेट घेऊन त्यांना फी वसुलीसंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे.
पूर्ण फीज भरा अन्यथा विद्यार्थांना विद्यापीठ परीक्षा अर्ज भरता येणार नाही. 2019-2020 या संपूर्ण शैक्षणिक वर्षाची फी प्रथम भरावी नंतरच परिक्षेला अर्ज भरता येईल, अन्यथा परिक्षा देता येणार नाही, असे डीवाय पाटील प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. लॅबोरेटरजीज फी ही संपूर्ण वर्षभरासाठी सुमारे 9200 रुपये एवढे शुल्क आकारले गेले आहे. विद्यापीठ विकसित फी सुमारे 1 हजार रुपये, तसेच विद्यार्थी अॅक्टिव्हिटी शुल्क सुमारे 4 हजार रुपये एवढे अतिरिक्त शुल्क आकारण्यात आले आहे. मात्र या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी लॅबोरेटरीज फी व अन्य किरकोळ शुल्क कोणत्या आधारे द्यावे. या शुल्कामध्ये पूर्णतः सवलत मिळावी, अशा संतप्त मागण्या पालकवर्गांकडून व्यक्त होत आहेत. विद्यापीठ टर्म फी 1800 रुपये आकरण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षाची निम्मी फी भरल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला विद्यापीठा अर्ज भरता येणार नाही. महाविद्यालये बंद असताना ही फी कशासाठी हा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित होत आहे.
अनेक पालकांमध्ये फी संदर्भात संभ्रम निर्माण झालेला असून, डी. वाय पाटील प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पालकवर्गात संतापाची लाट पसरली आहे. डीवाय पाटील महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 व 21 या वर्षासाठी इतर अॅक्टिव्हीटीसाठी जे शुल्क आकारले आहे. ती फी वसुल करण्यासाठी महाविद्यालयीन प्रशासनाकडून अडवणूक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना एकूण फीमधील 50 टक्के सवलत देण्यात यावी. ही आमची प्रमुख मागणी आहे. तसेच कोव्हीड काळात महाविद्यालय बंद असूनही, विविध कारणांसाठी जी फी आकारली गेलेली आहे. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना पूर्णतः सवलत देण्यात यावी.
– राजेंद्र पडवळ,
प्रदेशाध्यक्ष, छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य
आम्ही कोणत्याही प्रकारे फी वसुलीसाठी अडवणूक करत नाही. कोव्हीड संक्रमणाच्या पूर्वीच्या कालावधतीत जे शैक्षणिक वर्ष सुरु होते त्यासाठीची फी ही देणे बंधनकारक आहे. यात आमचे कोणतेही आडमुठे धोरण नाही. फी सवलतीबाबत सांगायचे झाले तर विद्यापीठाकडून किंवा शासनाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचा अद्यादेश अद्याप मिळालेला नाही. जर तसा अद्यादेश आला तर आम्ही निश्चित फी सवलतीसंदर्भात विचार करू.
-रणजीत पाटील,
प्रिंसिपल, डी. वाय. पाटील, महाविद्यालय, पिंपरी संत तुकाराम नगर
22 मार्च 2020 रोजी देशभरात पहिले लॉकडाऊन झाले. त्यानंतर अनेक पालकांचे उद्योग व्यवसाय, नोकरीवर आर्थिक संकट आले. अनेकांचे खाण्याचे वांदे झाले. तरीही पालकांच्या मागे जर डीवाय पाटील प्रशासन फी वसुलीसाठी तगादा लावत आहेत. या संदर्भात डी. वाय. पाटील प्रशासनाने फी संदर्भातील निर्णय एकमेकांवर न ढकलता आम्हा पालक वर्गांना सहकार्य करावे. प्रशासनाने जर फी माफ केली नाही तर आम्ही निश्चितच आंदोलनाचा पवित्रा घेऊ आणि डी. वाय पाटील प्रशासनाला धारेवर धरू.
-अभिजीत गोफण
युवा सेना प्रमुख- पिंपरी विधानसभा