महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – मुंबई – शुक्रवारनंतर सोने-चांदीच्या भावात शनिवारी पुन्हा घसरण झाली. चांदीच्या भावात एक हजार ५०० रुपये घसरण होऊन ती ६८ हजार ५०० रुपये तर सोन्याच्या भावात ५०० रुपयांची घसरण होऊन ते ४६ हजार ६०० रुपयांवर आले. मागणी कमी व सट्टाबाजारातील खरेदी-विक्रीचा हा परिणाम आहे. गेल्या आठवड्यात भाववाढ होत राहिलेल्या सोने-चांदीच्या भावात शुक्रवारी घसरण झाली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा शुक्रवारपेक्षा घसरण वाढली.
गेल्या काही महिन्यांपासून सोने-चांदीच्या भावात वाढ कायम असल्याने सोने ४७ हजारांच्या पुढे होते. मात्र १९ फेब्रुवारीला ते ४६ हजार ९०० रुपयांवर आले होते. त्यानंतर ते सतत ४७ हजारांच्या पुढेच होते.
कसा ठरतो सोन्याचा भाव?
डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा कधीच पार केला होता. कोरोनाच्या अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला होता. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.