महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य नेत्यांच्या गाठीभेटी घेण्याचा धडाका लावलेले खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट नेमकी कशासाठी होती याबाबत मात्र काहीवेळ समजू शकले नाही. मात्र, मनसेच्या ट्विटर हँडलवरून या भेटीची माहिती देण्यात आली. उदयनराजे हे घरातील एका लग्नसोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी कृष्णकुंजवर गेले होते.
गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले हे मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मराठा आरक्षाबाबत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. शनिवारी उदयनराजे यांनी मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चा रंगली.
मात्र, या भेटीबाबत मनसेने स्पष्टीकरण दिले असून ट्विटर हँडलवर फोटो शेअर केले आहेत. उदयनराजे सायंकाळी सहा वाजता कृष्णकुंजवर गेले आणि त्यांनी राज ठाकरे यांना त्यांच्या कौटुंबीक लग्न सोहळ्याचे निमंत्रण दिले. यावेळी राज ठाकरे यांना राजमुद्राही भेट दिली. यावेळी ठाकरे यांनी उदयनराजे यांचा सत्कार केला.