महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – रत्नगिरी -महावितरणचे विजबिल हफ्त्यांमध्ये भरण्याची सूचना राज्य सरकारने केली आहे. 1 ते 6 हफ्त्यांमध्ये विजबिल भरू शकत असतानाही हफ्त्याने विजबिल भरायला गेलेल्या ग्राहकांकडून विजबिल भरून घेत नसल्याचे दिसून येत आहे. हफ्त्याने विजबिल भरण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिला आहे. ते शनिवारी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी महावितरणसंदर्भांत एक बैठक झाली. त्या बैठकीत ग्राहकांची विजबिले हफ्त्याने स्विकारण्याची सूचना उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना केली. कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाचा आढावाही त्यांनी घेतला. सामंत म्हणाले की,22 हजार 391 जणांनी लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन केले असून 70 टक्के जणांनी लस घेतली आहे. पोलीस खात्यातील 80 टक्के जणांनी लस घेतली आहे. महसूल विभागातील 75 टक्के आणि आरोग्य विभागातील 18 टक्के जणांनी लस घेतली असून आरोग्य विभागाचे प्रमाण कमी असून त्याबाबत मी जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने यांच्याशी चर्चा केली आहे. 45 आणि 60 वर्षावरील व्यक्तींच्या लसीकरणाबाबतही नियोजन करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले