महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – मुंबई – 4 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ 2-1 फरकाने आघाडीवर असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमधील स्थान निश्चित करण्यासाठी भारताला इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी अनिर्णीत राखली तरी पुरेसे ठरणार आहे. ही फायनल दि. 18 ते 22 जून या कालावधीत ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर खेळवली जाणार आहे. अर्थात, या पार्श्वभूमीवर, इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेल्या मालिकेतील शेवटची कसोटी भारतासाठी महत्त्वाची असल्याने बीसीसीआय आणखी एक ‘टर्निंग ट्रक’ उपलब्ध करुन देण्याचा धोका स्वीकारणार नाही, अशी चिन्हे आहेत.
‘मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यासाठी चेंडू उत्तम उसळेल, अशी कठीण पृष्ठभागाची खेळपट्टी उपलब्ध करुन दिली जाईल आणि फलंदाजांना त्यावर सहज फटकेबाजी करता येईल. हा सामना लाल चेंडूवर खेळवला जाणार असल्याने मोठय़ा धावसंख्येचे डोंगर रचले जाणे पाहता येऊ शकते’, असे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. अहमदाबादमधील या नुतनीकरण केल्या गेलेल्या खेळपट्टीवर आयपीएल तसेच आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील बरेच महत्त्वाचे सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे देखील चौथ्या कसोटीत खेळपट्टी कशा स्वरुपाची असेल, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘दोन सामने एकाच मैदानावर खेळवले जात असताना केवळ एकाच सामन्यातील निकालावर खेळपट्टीचे स्वरुप ठरवणे चुकीचे ठरु शकते. या मैदानावरील दुसरी कसोटी झाल्यानंतर सामनाधिकारी श्रीनाथ आपला अहवाल सादर करतील व आयसीसी त्यावर आधारित कार्यवाहीची दिशा ठरवू शकेल. तूर्तास, इंग्लंड संघाने खेळपट्टीबद्दल कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही’, असे बीसीसीआयमधील या वरिष्ठ सूत्राने नमूद केले.
जर एखाद्या स्टेडियममधील एक खेळपट्टी उत्तम असेल व दुसरी खेळपट्टी खराब निघत असेल तर अशा परिस्थितीत आयसीसी त्यावर काहीही कारवाई करण्याची शक्यता कमी आहे. भारतीय संघ 3-1 फरकाने मालिका जिंकल्यास आणखी खुश असेल. पण, शेवटचा सामना बरोबरीत राखणे देखील पुरेसे असल्याने टर्नर ट्रकची तितकी आवश्यकता नाही, यावर बीसीसीआयमध्ये एकमत असल्याचे मानले जाते.
काय सांगतो आयसीसीचा नियम?
आयसीसीच्या नियमावलीप्रमाणे अशी खेळपट्टी खराब स्वरुपात गणली जाते, जेथे फलंदाज व गोलंदाज यांच्यात संतुलित खेळच होऊ शकत नाही. जर खेळपट्टी फक्त फलंदाजांनाच अनुकूल असेल, जर खेळपट्टीकडून गोलंदाजांकडून काहीच मदत मिळत नसेल, किंवा चेंडू जास्त स्पिन किंवा सीम होत असेल तसेच उलट स्थितीत फलंदाजांना धावाच जमवता येत नसेल तर अशा प्रकारची खेळपट्टी खराब स्वरुपाची मानली जाते. खेळपट्टीवर चेंडू खूपच वळत असेल तर अशा खेळपट्टीला देखील खराब गणले जाते.
भारतीय उपखंडातील खेळपट्टय़ांवर फिरकी गोलंदाजीला पोषक स्थिती असते. येथे काही दिवस चेंडू उत्तम वळतो. पण, चेंडू अनपेक्षितरित्या उसळून वर येत असेल व त्याच खेळपट्टीवर काही चेंडू अचानक खाली रहात असेल तर अशी खेळपट्टीही खराब श्रेणीत येते. खेळपट्टी खराब असल्याचे स्पष्ट होत असेल व यामुळे सदर स्टेडियमच्या खात्यावर 5 डिमेरिट गुण होत असतील तर अशा स्टेडियमला आयसीसी एका वर्षासाठी निलंबित करु शकते.