महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – पुणे -पुणे शहरातील शाळा कॉलेज १४ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. तसेच रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी राहणार असल्याची माहिती पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.दरम्यान, पुणे शहरात शनिवारी 8 हजार 41 संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. गेल्या वर्षापासून कोरोना चाचण्यांचे प्रमाण प्रथमच 8 हजारांच्या वर गेले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढलेल्या संख्येबरोबरच त्यांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचा प्रभावीपणे होणारे ’काँटॅक्ट ट्रेसिंग’ या कारणामुळे ही आकडेवारी वाढली आहे.
शहरात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला कोरोना रुग्णांची संख्या दरदिवशी दीडशे ते दोनशेच्या दरम्यान होती आणि रुग्णवाढीचा दर 5 टक्के होता. आता मात्र, ही संख्या चार पटींनी वाढली असून, सध्या 700 पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे त्या रुग्णांच्या संपर्कात येणार्या संशयितांची संख्यादेखील वाढली आहे.