महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – रत्नागिरी – राज्यात पुन्हा कोरोनाचे संकट दिसून येत आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे कोविड-१९ च्या नियमांचे पालन करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार कोकणातील ( Konkan) रत्नागिरी (Ratnagiri) येथील गणपतीपुळेमधील (Ganpatipule) अंगारकी यात्रोत्सव आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुणकेश्वर (Kunkeshwar) देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील अंगारकी यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विवेक भिडे यांनी दिली. येत्या मंगळवारी २ मार्च रोजी अंगारकी यात्रा आहे. गणपतीपुळे येथे प्रत्येक संकष्टीला मोठी गर्दी होते. येत्या मंगळवारी कोरोनानंतरची पहिलीच अंगारकी असल्याने मोठी गर्दी होण्याची शक्यता होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यात्रोत्सव रद्द करण्याची सूचना जिल्हा प्रशासनातर्फे देवस्थानला करण्यात आली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गणपतीपुळे देवस्थानाने यात्रोत्सव रद्द केला आहे.
.
कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची 11 ते 13 मार्च दरम्यान होणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रद्द करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कुणकेश्वर देवस्थानच्या आगामी यात्रा नियोजनाबाबत मंदिराच्या विश्वस्तांसमवेत आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला.