महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – मुंबई – भारतामध्ये 5G नेटवर्कची (India 5G Network) आतुरतेने वाट पाहत आहेत. आताच या नव्या सेल्युलर नेटवर्कचे फायदे सांगण्यात आले होते. पंरतु पहिल्यांच 5G नेटवर्कमध्ये काही त्रुटी समोर आल्या आहेत. परदेशात 5G नेटवर्कविषयी काही मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या आहेत.
IANS यांनी दिलेल्या माहितीनुसार 5G नेटवर्क हे तुमच्या मोबाईलच्या बॅटरीसाठी जास्त चांगले नाही आहे. 5G नेटवर्कमुळे तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत आहे. अलीकडेच अमेरिकेमधील सेल्युलर कंपनीने व्हेरिजॉनने (Verizon) ग्राहकांना त्यांच्या मोबाइलमधील 5G नेटवर्क बंद करण्यास सांगितले आहे. मोबाईलची बॅटरी वाचवण्याचा एक मार्ग म्हणजे आपला मोबाईल एलटीई किंवा 4G नेटवर्कमध्ये ठेवणे हे कंपनीने ट्विटद्वारे ग्राहकांना सांगितले आहे.
तज्ज्ञ म्हणतात की, अमेरिकेत 5G नेटवर्क सुरू झाले आहे. परंतु यादरम्यान, बर्याच युझर्सने मोबाइलची बॅटरी लवकर संपत असल्याची तक्रार केली आहे. लोक म्हणतात की, 5G नेटवर्क वापरत असल्यामुळे मोबाईल वारंवार चार्ज करावा लागत आहे.
सध्या भारतातही 5G नेटवर्कची तयारी सुरू आहे. केंद्र सरकारने अलीकडेच म्हटले आहे की, या वर्षाच्या अखेरीस देशात 5G नेटवर्क सेवा सुरू केली जाईल. सरकारने हे स्पष्ट केले की, 5G नेटवर्क पहिलं काही शहरांत सुरू केले जाईल आणि मग त्याचा प्रसार हळूहळू देशभरात होईल.
सध्याच्या 4G नेटवर्कपेक्षा 5G नेटवर्क अधिक वेगवान असेल. डेटा ट्रान्सफर १० पट ते १०० पट वेगवान असेल.
तज्ज्ञांचे मत आहे की, 5G नेटवर्क आल्यानंतर काही सेकंदातच यूट्यूब किंवा टिकटॉकवर व्हिडिओ अपलोड केले जातील. सध्या या प्लॅटफॉर्मवर कोणताही व्हिडिओ अपलोड करण्यास बराच वेळ लागतो.