महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – पुणे – शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत तालुक्यातील नोंदणीकृत असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या २० तर मराठी माध्यमाच्या तीन अशा २३ विना अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली वर्गासाठीच्या १०७ प्रवेशाच्या जागा प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया तीन मार्चपासुन सुरू होणार असल्याने पालकांना पाल्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक त्या कागदपत्राची जमवाजमव करावी लागणार आहे.
प्रवेशासाठी वंचित गटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा (अ), भटक्या जमाती (ब),भटक्या जमाती (क),भटक्या जमाती (ड), इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विशेष मागासप्रवर्ग (एसबीसी), दिव्यांग बालके, एचआयव्ही प्रभावित बालके यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्व मागासवर्गीय प्रवर्गातील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना उत्पन्न दाखल्याची आवश्यकता असणार नाही. मात्र जातीचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तसेच दिव्यांग व एचआयव्ही बाधित प्रभावित बालकांना जिल्हा शल्यचिकित्सक व सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
तसेच आर्थिक दुर्बल घटकातील खुल्या प्रवर्गातील बालकांच्या पालकांचे उत्पन्न एक लाखाच्या आत असल्याचे २०२०-२१ या वर्षासाठीचा सक्षम अधिकाऱ्यांचा उत्पन्न दाखला प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. प्रवेशासाठी जन्माचे प्रमाणपत्र, वास्तव्याचा पुरावा, उत्पन्नचा दाखला (आर्थिक दुर्बल घटकांसाठी), भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांना दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा, वंचित घटकांसाठी पालकांचा, बालकांचा जातीचा दाखला दिव्यांग प्रमाणपत्र ( ४१टक्के पेक्षा जास्त), एक लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला. घटस्फोटित महिलेसाठी न्यायालयाचा निर्णय, आई व बालकांचा रहिवाशी पुरावा, वडिलांचे जात प्रमाणपत्र, आईचा उत्पन्न दाखला. विधवा महिलांसाठी पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, वडिलांचे जात प्रमाणपत्र, उत्पन्नचा दाखला. अनाथ बालकांसाठी अनाथालयाची कागदपत्रे, जे पालक सांभाळ करतात, त्याचे हमीपत्र. दिव्यांग बालकांसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र ४१ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असणे बंधनकारक आहे.