महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – मुंबई – जगात सध्या अनेक देशांमध्ये इलेक्ट्रिक कारचा वापर केला जात असला तरी, त्याचे प्रमाण कमी जास्त आहे. या मागचं कारण त्या त्या देशांमध्ये असणाऱ्या सोयी सुविधा. ग्राहकांची मागणी, बाजारातील किंमत, चार्जिंगसाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर, सरकारच्या पॉलिसी आणि देण्यात येणारं अनुदान, प्रोत्साहन या बाबींमुळे कमी जास्त वापर होतो.नितीन गडकरी यांनीही काही दिवसांपूर्वी ‘इलेक्ट्रिक व्हेइकलचा वापर वाढवला पाहिजे’, असं म्हटलं होतं. दरम्यान, देशात 2030 पर्यंत इलेक्ट्रिक वाहने धावतील अशी सरकारची योजना आहे. मात्र, त्याआधी आवश्यक असलेल्या सुविधा तयार करण्याचं आव्हान असणार आहे. इंधनाचे दर इतके भडकले आहेत की, सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचले आहेत. तर दुसरीकडं वाहनांची वाढती संख्या ही प्रदूषणाला आमंत्रण देत आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धूरामुळे प्रचंड प्रदूषण होत आहे. याचा गंभीर परिणाम जगाला भोगावा लागत आहे.
जगात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये होणारी वाढ, देशात त्यावर लावले जाणारे कर यामुळं इंधनाचे दर वाढतच आहेत. इंधनाच्या वाढत्या दरामुळं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलंय. तर, दुसरीकडं वाहनांमुळं होणारे प्रदूषणही पर्यावरणासाठी हानिकारक आहे. याच पार्श्वभूमीवर आता इलेक्ट्रिक व्हेइकल्सना प्रोत्साहन मिळत आहे. जगात सध्या अनेक देशांमध्ये इलेक्ट्रिक कारचा वापर केला जात असला तरी, त्याचे प्रमाण कमी जास्त आहे. यामागचं कारण त्या त्या देशांमध्ये असणाऱ्या सोयी सुविधा. ग्राहकांची मागणी, बाजारातील किंमत, चार्जिंगसाठीचे इन्फ्रास्ट्रक्चर, सरकारच्या पॉलिसी आणि देण्यात येणारं अनुदान, प्रोत्साहन या बाबींमुळे कमी जास्त वापर होतो.
इलेक्ट्रिक कार निर्मिती – भारतात केंद्र सरकारने देशाला 2030 पर्यंत इलेक्ट्रिक व्हेइकल नेशन बनवण्याचं ध्येय ठेवलं आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत दुचाकीला जास्त पसंती दिली जात आहे. त्या तुलनेत इलेक्ट्रिक कारचं प्रमाण मात्र कमी आहे. देशात अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला लवकरच कार निर्मिती सुरु करणार आहे. त्यासाठी बंगळुरूमध्ये नवीन कार्यालयाची नोंदणी केली आहे.
महाराष्ट्रात चार्जिंग स्टेशन – भारतात दिल्ली, नोएडात चार्जिंग स्टेशन उभारणी सुरु आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील दोन शहरांचाही यामध्ये समावेश आहे. ठाण्यानंतर आता औंरंगाबाद शहरातही चार्जिंग स्टेशन उभारली जाणार असल्याची माहिती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबाद महापालिकेच्या वतीने देण्यात आली होती.
इलेक्ट्रिक व्हेइकलमध्येही दोन प्रकार आहेत. यामध्ये एक अशी गाडी जी फक्त चार्जिंगवर चालते. यासाठी बॅटरीचा वापर केला जातो. तर दुसरी हायब्रिड इलेक्ट्रिक व्हेइकल्स, यामध्ये बॅटरी तर असतेच पण सोबत पेट्रोल, डिझेल किंवा गॅस यावरही चालतात.
इन्फ्रास्ट्रक्चर
इलेक्ट्रिक वाहनांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे. प्रगत देशांनी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देताना त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यावर भर दिला आहे. इलेक्ट्रिक व्हेइकलसाठी चार्जिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जागोजागी चार्जिंग पॉइंट असणे गरजेचे आहे. तसंच चार्जिंग होईपर्यंत गाड्यांच्या पार्किंगसाठी तेवढ्या जागेचं नियोजनही करावं लागेल. जगातील अनेक देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी अशा इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव आहे. त्यामुळे इंड़स्ट्रीसुद्धा इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये उतरण्याचा धोका पत्करण्यास तयार नसल्याचं दिसतं.
” इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे फायदे “
खर्च कमी – इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांचा मेंटनन्स कमी असतो. हा खर्च जवळपास पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत 50 टक्के इतका कमी असू शकतो.
पर्यावरणपूरक – इलेक्ट्रिक वाहनांचा मोठा फायदा म्हणजे ही वाहने पर्यावरणपूरक असतात. त्यामुळे प्रदूषण होत नाही. इलेक्ट्रिक कार शून्य उत्सर्जन करतात. त्यामुळे ग्रीन हाउस वायू कमी होण्यास मदत होते.
बॅटरी – इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी चार्जिंगची समस्या आहे. मात्र चार्जिंग स्टेशनवर चार्ज केलेली बॅटरी घेऊन डिस्चार्ज केलेली बॅटरी देता येते. यावर सध्या जगभरात काम केलं जात आहे.