लाल मिरची देणार सर्वसामान्य ग्राहकांच्याच खिशाला तडका

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.७ मार्च – मुंबई – स्वयंपाक अधिक रुचकर होण्यासाठी त्यावर लाल मिरचीचा तडका दिला जातो. पदार्थ चमचमीत करण्यासाठी त्यात लाल मिरची पावडर जरा जास्तच टाकली जाते. पण, आता या लाल मिरचीने सर्वसामान्य ग्राहकांच्याच खिशालाच तडका दिला आहे. गेल्या तीन महिन्यांत बेडगी, संकेश्वरी, तेजा, गुटुंर आणि गावठी मिरचीच्या दरात जवळपास २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मसालाही महागला आहे.

मिरची हा प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक. भाजणीच्या मसाल्यात मिरचीचे प्रमाण हे ६० टक्क्यांहून अधिक, तर मिरचीपूड तयार करताना हे प्रमाण सुमारे ९५ टक्के इतके असते. त्यामुळे मिरची महागली की आपोआप मसालेही महागतात. बाजारात मिळणाऱ्या तयार मसाल्यांसह घरात बनविल्या जाणाऱ्या मसाल्यांसाठीही हेच सूत्र लागू पडते.

# पाऊस लांबल्याने त्याचा मिरचीवर परिणाम झाला. त्यामुळे यंदा मिरची उशिराने बाजारात दाखल झाली. अवकाळी पावसामुळे दक्षिणेत शेतीचे मोठे नुकसान झाल्यानेही आवक काही प्रमाणात कमी झाली.
# दुसरे म्हणजे बहुतांश मसाले कारखान्यांकडून दुय्यम प्रतीच्या मिरच्यांची मागणी वाढल्यामुळे घाऊक बाजारात त्यांचे दर वधारले आहेत.
# उच्च प्रतीच्या मिरच्यांच्या तुलनेत एकरामागे दुय्यम मिरच्यांचे उत्पादन तिप्पट अधिक मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे आपला कल
वाढविला आहे.
# परिणामी, उत्पादन कमी झाल्याने उच्च प्रतीच्या मिरच्यांच्या दरात वाढ, तर मसाले उत्पादकांकडून मागणी वाढल्याने दुय्यम प्रतीच्या मिरच्यांची किंमत वाढली आहे.

लालबागमधील मसाला बाजारात – लवंगी २८०, तर गावठी मिरची २४० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *