महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.७ मार्च – शहरात नव्या करोना रुग्णांची संख्या वाढत असली, तरी त्या तुलनेत मृत्युदर नियंत्रणात असल्याचे गेल्या दहा दिवसांतील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गंभीर रुग्णांपेक्षा लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या, तातडीने निदान आणि योग्य उपचारांमुळे शहरातील मृत्युदर नियंत्रणात असल्याचे निरीक्षण आरोग्य तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्येसोबत मृतांची संख्याही वेगाने वाढत होती. जून ते सप्टेंबर महिन्यांत अनेकदा मृत्यूसंख्या दोन आकडी होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यानंतर मृत्युदरही घटला होता. आता गेल्या महिनाभरापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी शहरात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दहाच्या खाली असल्याचे दिसत आहे.
याबाबत माहिती देताना महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले, ‘करोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत आता मृत्यूदर कमी आहे. कारण सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असली, तरी त्यामध्ये लक्षणे विरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. अशा प्रकाराचे सुमारे पाच हजार रुग्ण घरीच विलगीकरणात आहेत. उर्वरित चौदाशे रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. गंभीर रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारांच्या पद्धतीही आता निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे गंभीर रुग्णांना तातडीने आणि वेळेवर उपचार मिळत असल्याने मृत्युदर नियंत्रणात आहे.’