महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च ।पुणे । कोरोनाचा संसर्ग वाढल्यानांतर सर्वाधिक मागणी असलेल्या रेमडेसिवीर औषधाची किंमत हा महत्त्वाचा मुद्दा होता. भरमसाठ पैसे घेऊन नफेखोरी करणाऱ्यांना आता आळा घालण्यासाठी विक्री किंमतीवर जास्तीत जास्त ३० टक्के किंमत आकारण्याची मुभा देण्यात येणार आहे. उत्पादकांनीही याला सकारात्मकता दर्शविली असून लवकरच रेमडेसिवीरची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
करोना रुग्णांची संख्या कमी असताना रेमडेसिवीरची मागणीही कमी झाली होती. परंतु मागील महिनाभरात पुन्हा त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे काळाबाजार होऊ नये यासाठी तुटवडा भासू नये, यासाठी प्रशासनानेतपासण्या सुरू केल्या आहेत.या औषधाचे सहा उत्पादक असून यांच्या छापील किमतीमध्ये तफावत आहे. १०० मिलिग्रॅम इंजेक्शनसाठी चार ते साडे पाच हजार रुपये आकारले जातात. तेव्हा यांच्या किमती निश्चित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने राष्ट्रीय औषध किंमत नियंत्रण प्राधिकरणाकडे गेल्या आठवड्यात दिला आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनची छापील किंमत चार ते साडे पाच हजारांदरम्यान असली तरी रुग्णालयांना आणि घाऊक विक्रेत्यांना मात्र ते सुमारे ८०० ते १३०० रुपयांना उपलब्ध होत असल्याचे प्रशासनाला तपासणीत आढळले. काही रुग्णालये खरेदी किमतीच्या १० ते ३० टक्के अधिक किंमत आकारून छापील किमतीपेक्षाही कमी किमतीत रुग्णांना देत आहेत.