महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१२ मार्च ।पुणे । टाटा मोटर्सनं (Tata Motors) मार्च महिन्यात आपल्या विविध कार्सवर (Cars) तब्बल 75 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट (Discount) जाहीर केला आहे. यामध्ये रोख रक्कम, एक्स्चेंज बोनस आणि लॉयल्टी डिस्काउंट अशा स्वरूपात ही सूट देण्यात येत आहे. यात बहुचर्चित हॅरिअरवर (Harrier) तब्बल 70 हजारांपर्यंत सूट मिळत आहे. त्याशिवाय टीगॉर (Tigor), टियागो (Tiago), नेक्सॉन (Nexon) या कार्सच्या विविध मॉडेल्सवर घसघशीत सवलत जाहीर करण्यात आली आहे. अलीकडेच दाखल करण्यात आलेल्या सफारीवर (Safari) मात्र कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. ऑटोकार इंडियानं ही माहिती दिली आहे.
Tata Harrier : ही टाटा मोटर्सची लोकप्रिय कार असून, यामध्ये 170 हॉर्सपॉवर 2 लिटर क्षमतेचं टर्बो इंजिन आहे. यात 6 स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक गिअर बॉक्स आहे. एम जी हेक्टरशी स्पर्धा करणाऱ्या या कारवर सध्या 70 हजार रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. रोख आणि एक्स्चेंज बोनस अशा स्वरूपात ही सवलत मिळणार आहे.
Tata Tigor : या कॉम्पॅक्ट कारवर (Compact Sedan Car) 33 हजारांपर्यंत सवलत मिळत असून, रोख आणि एक्स्चेंज बोनससह कार्पोरेट डिस्काऊंट यांचा यात समावेश आहे. मारुती सुझुकीच्या डिझायर या कारशी स्पर्धा करणाऱ्या या कारमध्ये 86 बीएचपीचे 1.2 लिटर क्षमेतेचे पेट्रोल इंजिन आहे.
Tata Tiago : हुंदाई सँट्रो, मारुती वॅगन आर यांच्याशी टक्कर देणाऱ्या स्टायलीश हॅचबॅक (Hatchback) टियागोमध्ये टीगॉरसारखेच पॉवरट्रेन्स इंजिन आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनं या कारला जागतिक पातळीवर चार स्टार रेटिंग मिळालं आहे. मार्च महिन्यात या कारवर रोख आणि एक्स्चेंज बोनस अशा स्वरूपात सूट देण्यात आली आहे.
Tata Nexon : टाटा नेक्सॉन ही डीझेल आणि पेट्रोल अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध असणारी कार असून, हुंदाई व्हेन्यू, महिंद्रा एक्सयुव्ही 300 यांच्याशी तिची स्पर्धा आहे. डिझेल नेक्सॉनमध्ये 110 बीएचपीचे 1.5 लिटर क्षमतेचं टर्बो डिझेल इंजिन आहे, तर पेट्रोल नेक्सॉनमध्ये 1.2 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन आहे. मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स असे पर्याय यात आहेत. नेक्सॉन डिझेलवर मार्च महिना अखेर पर्यंत 20 हजार रुपये सवलत मिळणार आहे. तर इलेक्ट्रिक नेक्सॉन ईव्हीवरही 10हजार रुपये एक्स्चेंज बोनस मिळणार आहे.