महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१३ मार्च । मुंबई ।दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी धुराळा, डबल सीट, टाईम प्लीज आणि आनंदी गोपाळ यांसारख्या दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून आता त्यांचा ‘महात्मा’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटांचे शीर्षक आणि व्हिडिओ प्रदर्शित करून चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे.
‘महात्मा’ हा समीर विद्वांस दिग्दर्शित चित्रपट आहे. थोर समाजसुधारक जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. जोतीराव फुलेंनी महिलांना शिक्षण देऊन एक क्रांती घडवून आणली. सावित्रीबाई फुले यांना भारतातील महिला शिक्षणाच्या प्रणेत्या म्हणून संबोधले जाते. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या पतीसमवेत महिला हक्क सुधारणेच्या दृष्टीनेही काम केले.अजय-अतुल ही मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगितकार जोडी या चित्रपटाला संगीत देणार आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रसिद्ध होईल. ‘क्रांतिसूर्य’ हा चित्रपट जोतीराव फुलेंच्या आयुष्यावर असणार आहे तर ‘क्रांतीज्योती’ हा चित्रपट सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यावर असणार आहे.
हा चित्रपट प्रतिसाद आणि ह्युज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनलेला आहे. रणजित गुगळे आणि अनिश जोग या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अद्याप हा चित्रपट निर्मिती प्रक्रियेत असून अजूनही मुख्य भूमिकेतील कलाकाराचा चेहरा समोर आलेला नाही. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.