महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च । पिंपरी । कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क बंधनकारक, गर्दी टाळणे अशा उपाययोजनांसह लसीकरणावरही भर दिला आहे. आजपर्यंत ६२ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. येत्या एक-दोन दिवसांत लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे नियोजनही महापालिकेने केले आहे. महापालिकेने सुरुवातीला नोंदणीकृत अधिकारी, कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर यांना लस दिली. त्यानंतर एक मार्चपासून शहरातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली. आता ज्येष्ठांसह गंभीर आजार असलेल्या ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांनाही लस दिली जात आहे. यामध्ये ह्रदयविकार, मूत्रपिंड, कॅन्सर, यकृत, मधुमेह, एचआयव्ही बाधित अशा रुग्णांचा समावेश आहे. अशा रुग्णांनी आजाराचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
मी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. लस पूर्णतः सुरक्षित आहे. तिच्याबाबत आपल्या मनात कोणताच संदेह ठेऊ नये. पुढील तीन-चार दिवसांत ५० लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहेत. यामुळे ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व गंभीर आजार असलेले ४५ वर्षांवरील नागरिक यांना लसीकरण करणे सुकर होणार आहे. लसीचा डोस घेतल्यानंतरही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. लसीकरणानंतरही मास्क, सॅनिटायझर व सामासिक अंतर पाळणे आवश्यक आहे, यामुळे आपण आपले व आपल्या आजूबाजूच्यांचे संरक्षण करणार आहोत.
– राजेश पाटील, आयुक्त, महापालिका
लसीकरणाने प्रतिकारक्षमता वाढते
एका व्यक्तीला दोन टप्प्यात कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. पहिल्या डोसनंतर आठ ते दहा दिवसांनी शरीरात अँटिबॉडीज (प्रतिपिंडे) तयार होतात. पहिला डोस घेतल्यानंतर साधारणतः ६५ टक्के प्रतिकार क्षमता शरीरात तयार होते. आणि दोन्ही डोस घेतल्यानंतर ७० ते ९० टक्के प्रतिकारक्षमता निर्माण होते, असे महापालिका अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.