महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च ।पुणे । नेहमी पेक्षा ह्या वर्षी उन्हाचा पारा जास्त आहे, कडक उन्हामुळे उष्माघाताबरोबरच डिहायड्रेशनच्या समस्याही वाढू लागतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमी होत असते. ते टाळण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागत असते.
उन्हाळ्यामध्ये कलिंगडचे सेवन लाभदायक ठरते. या फळामध्ये 90 टक्के पाणीच असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची गरज भागवण्यासाठी तसेच त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ते उपयुक्त ठरते. शहाळ्याच्या पाण्यामध्ये पोषक घटक अनेक असतात. त्यामुळे शरीर थंड ठेवण्याबरोबरच आजारांना दूर ठेवण्यासाठीही ते गुणकारी आहे. थकवा दूर करण्यासाठी लिंबू-पाणी उपयुक्त ठरते तर शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी काकड्यांचे सेवन लाभदायक असते. ताक, लस्सी यामुळेही शरीरातील उष्णता मर्यादित राहते. उन्हाळ्यात सॅलड, कोशिंबिरी, हिरव्या भाज्या व हलका आहार लाभदायक ठरतो. अशा आहारामुळे डिहायड्रेशनची समस्याही दूर राहते.