महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । नवीदिल्ली । केंद्रीय रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरींनी संसदेत गुरुवारी व्हेइकल स्क्रॅप पॉलिसीचे मुख्य मुद्दे सांगितले.ते म्हणाले, जुनी गाडी स्क्रॅप करून (भंगारात टाकून) नवी कार विकत घेतल्यास किमतीत ५% सूट मिळेल. जुन्या वाहनाचे स्क्रॅप मूल्य स्क्रॅप सेंटर ठरवतील. ते नव्या वाहनाच्या एक्स-शो रूम किमतीच्या ४% ते ६% असेल. खासगी वाहनांवर २५% व व्यावसायिक वाहनांवर १५% रोड टॅक्समध्ये सूट द्यावी, असे केंद्र सरकार राज्य सरकारांना सांगू शकते. रजिस्ट्रेशन फीसही माफ केली जाऊ शकते. अशा पद्धतीने नव्या वाहनावर १०% ते १५% पर्यंत सूट मिळू शकते.
गडकरी म्हणाले, फिटनेस टेस्ट आणि स्क्रॅपिंग सेंटरसाठी नियम १ ऑक्टोबरपर्यंत लागू होण्याची शक्यता आहे. १५ वर्षांपेक्षा जुन्या सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील वाहनांसाठी स्क्रॅप पॉलिसी १ एप्रिल २०२२ पासून लागू होऊ शकते. हेवी व्हेइकलची अनिवार्य फिटनेस टेस्ट १ एप्रिल २०२३ पासून लागू होऊ शकते. यानंतर इतर श्रेणींसाठी योजना ११ जून २०२४ पर्यंत टप्पेनिहाय लागू होईल. यातून १० ते ३५ हजार नव्या नोकऱ्यांच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. २ वर्षांत १०० स्क्रॅपिंग सेंटर सुरू होतील. येत्या काही आठवड्यांत स्क्रॅप धोरणाचा मसुदा जारी करून सल्ले मागवले जातील.
गडकरी म्हणाले, वर्षभरात सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टाेलनाके बंद होतील. त्यांच्याऐवजी तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल वसुली होईल. सर्व हायवेंवर जीपीएस लावले जातील. त्याद्वारे वाहनांची ट्रॅकिंग हाेईल. लोकांनी जेवढा रस्ता वापरला, तेवढाच टोल भरावा लागेल.
६.५ लाखांच्या वाहनावर ८०,००० रुपयांचा फायदा
तुम्ही ६.५ लाख रुपयांची नवी कार विकत घेतली. तितक्याच किमतीची गाडी स्क्रॅप केली तर स्क्रॅपवर सुमारे ३२,५०० रुपये मिळतील. नव्या वाहनाच्या किमतीत ३२,५०० रुपयांची सूट मिळेल. रोड टॅक्सवर सुमारे १३ हजार आणि रजिस्ट्रेशन फीसमध्ये सरासरी १००० रुपयांची सूट मिळेल. अशा पद्धतीने सुमारे ८०,००० रुपयांपर्यंत फायदा होईल.