महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । पुणे ।२५ लाखांचे असे ५० लाख कसे होतील…. जरा विचार करा….. पुण्यात असाच प्रकार समोर आला आहे. ५० लाख मिळतील या आमिषाला भुलून एका हॉटेल चालकानं 25 लाख दिले… त्याबदल्यात त्याला काय मिळालं.? पैशाच्या नादी लागल्यानं हॉटेल व्यावसायिकाला डोक्याला हात लावण्याची वेळ आली.
आमच्याकडे मोठ्या प्रमाणात ब्लॅकमनी आहे, तो सांभाळण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटांची गरज आहे. २५ लाखांच्या २ हजारांच्या नोटा द्या. आणि त्याबदल्यात पाचशे रुपयांच्या पन्नास लाखांच्या नोटा देऊ.अशी बतावणी करुन शिवणेमधल्या हॉटेल व्यावसायिकाला गंडा घालण्यात आला. या प्रकरणात डॉ. व्यंकटरमण वसंतराव, प्रवीण वनकुंद्रे, मालेश गावडे या तिघांना अटक करण्यात आलीय. आणखी दोघांचा शोध सुरू आहे.
फरासखाना पोलीस ठाण्यात याबाबत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मुख्य आरोपीचा शोध घेण्यास पुणे पोलिसांना यश येत नसल्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला जातोय. आता या गुन्ह्याच्या तपासाचा वेग ही वाढवण्यात आलाय. मुख्य आरोपीच्या मागावर विशेष पथक रवाना देखील करण्यात आलं आहे.पोलीस तपासात काय घडलं ते समोर येईलच… मात्र अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका….