महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मार्च । मुंबई । इलेक्ट्रिक कारवर सर्वांच्या नजरा असताना, देशात ई-मोबिलिटी क्षेत्रात स्कूटरने बाजी मारली आहे. ओलासारखे नवे खेळाडू बाजारात उतरणे आणि पोषक सरकारी धोरणांचा फायदा ई-स्कूटर्सना मिळणार आहे. २०३० पर्यंत देशात विकणाऱ्या एकूण स्कूटर्समध्ये निम्म्या ई-स्कूटर्स असतील, असा अंदाज आहे. वित्तीय सेवा प्रदान करणारी कोटक इन्स्टिट्युशन इक्विटीच्या एका अहवालानुसार, भारतात इलेक्ट्रिक स्कूटर श्रेणी एका निर्णायक वळणावर आली आहे. अॅडव्हान्स केमेस्ट्री सेलमध्ये पीएलआय स्कीम, मेक इंडिया आणि फेम-२सारखे अनुकूल सरकारी धोरणे, बाजारात नवे खेळाडू उतरल्याने वेगाने वाढणारी स्पर्धा आणि पेट्रोल स्कूटर्सच्या तुलनेत आक्रमक किमतीत चालणाऱ्या ई-स्कूटर बाजारात वेगाने वाढण्यासाठी तयार आहेत.
कोटक इन्स्टिट्युशन इक्विटी रिसर्चचे विश्लेषक हितेश गोयल यांनी आपल्या अहवाालात नमूद केले की, पीएलआय योजनेमुळे बॅटरीच्या किमती कमी होतील आणि यामुळे ई-स्कूटरच्या किमतीत घट येईल. एकूण वाहन खर्चाच्या जवळपास ४०-५०% बॅटरी खर्च होते. ओला इलेक्ट्रिक आक्रमक मूल्य धोरणाचे पालन करेल. २०३० पर्यंत ५० टक्के स्कूटर इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरीत होतील. २०३६ पर्यंत स्कूटरचा ६० टक्के हिस्सा इलेक्ट्रिककडे शिफ्ट होईल.