महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २२ – मुंबई – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या १०० कोटी रुपये वसुलीच्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ राजीनामा देण्यासाठी चहूबाजूने दबाव वाढत आहे. विरोधी पक्ष भाजपने रविवारपासून राज्यभरात आंदोलनाचा धडाका लावला असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही जोरदार खलबते सुरू आहेत. रविवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्रीच घेतील असे सांगितले.
रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे नेते तातडीने दिल्लीत पोहोचले. त्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते कमलनाथ आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल या सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी सुमारे अडीच तास चर्चा केली. बैठकीचा तपशील कळू शकला नाही. मात्र बैठकीत अनिल देशमुख प्रकरणावर चर्चा झाली नाही असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. दरम्यान, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहेत. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मागच्या आठवड्यात दिल्लीला येऊन गेले. त्यानंतर माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी गृहमंत्र्यांवर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचे आरोप केले आहेत. यामागे महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असू शकतो, मात्र त्यात यश येणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व महाविकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. गृहमंत्री देशमुख यांच्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून देशमुख यांच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, सोमवारी त्याबाबत निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.