पोस्टाच्या योजना मुदतीपूर्वी बंद करताना ; अटी आणि नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २२ – पुणे – पोस्टाच्या बचत योजना आजही लोकप्रिय आहेत. पोस्टाच्या अनेक मुदत ठेव योजना असून, अनेकदा या योजनेतील पैसे मुदतीपूर्वी काढण्याची वेळ खातेधारकावर येते. कोणत्या योजनेचे पैसे किती वर्षांनंतर मिळू शकतात, ते मिळविण्यासाठीच्या अटी आणि नियम काय आहेत, व्याजात कपात होते का, शुल्क कापून घेतले जाते का, या प्रश्नांची उत्तरे गुंतवणूकदाराला ठाऊक असणे आवश्यक आहे.

पोस्ट खात्याच्या अल्पबचत योजना हे आजही बचतीचे आकर्षक माध्यम मानले जाते. या योजनांमध्ये गुंतवलेली रक्कम सुरक्षित राहते आणि त्यावर आकर्षक व्याज मिळते, ही या योजनांच्या लोकप्रियतेची कारणे आहेत. पोस्टाच्या बहुतांश अल्पबचत योजनांसाठी एक विशिष्ट मॅच्युरिटी पीरिअड असतो. त्यालाच लॉक-इन पीरिअड असेही म्हणतात. तरीसुद्धा मॅच्युरिटी होण्यापूर्वी पोस्टाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत असलेले खाते बंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मॅच्युरिटी होण्यापूर्वी पोस्टाच्या कोणत्या योजनेचे खाते कधी बंद करता येते, याविषयीची माहिती त्या योजनांमध्ये गुंतवणूक करणार्‍यांना असायला हवी. त्याचप्रमाणे असे केल्यास प्रीमॅच्युअर चार्ज म्हणजे योजनेचा अवधी पूर्ण होण्याआधी पैसे काढल्याबद्दल द्यावे लागणारे शुल्क भरावे लागते का, हेही ठाऊक असायला हवे.

पोस्ट ऑफिसमध्ये उघडण्यात आलेले बचत खाते (सेव्हिंग्ज अकाऊंट) आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बचत योजनेअंतर्गत (सीनिअर सिटिझन सेव्हिंग स्कीम) काढलेले खाते कधीही बंद करता येते. ज्येष्ठ नागरिकांचे बचत खाते मुदतीपूर्वी बंद करण्याची अनुमती आहे; परंतु एक वर्ष पूर्ण होण्याआधीच खाते बंद केले तर पोस्ट ऑफिस त्या खात्यातील रकमेवर व्याज देत नाही. तसेच खाते सुरू करून वर्ष पूर्ण झाल्यानंतर खाते बंद केले तर डिपॉझिटमधील 1.5 टक्का रक्कम पोस्ट खाते कापून घेते. दोन वर्षांनंतर खाते बंद केल्यास 2 टक्के डिपॉझिटची रक्कम कापली जाते.

पोस्ट खात्यात आपण एक वर्ष ते पाच वर्षे मुदतीचे मुदत ठेव (टर्म डिपॉझिट) खाते सुरू करू शकतो. पोस्टाच्या या टर्म डिपॉझिट योजनेअंतर्गत उघडलेले खाते सहा महिन्यांनंतर कधीही बंद करता येते. खाते उघडून सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आणि एक वर्ष पूर्ण होण्याआधी जर खाते बंद केले, तर त्यावर बचत खात्याचे व्याजदर लागू होतात. दोन, तीन किंवा पाच वर्षांसाठीचे टर्म डिपॉझिट खाते एक वर्षाचे झाल्यानंतर मुदतीपूर्वी बंद करण्यासाठी मुदत ठेवीवर ज्या व्याज मिळते (म्हणजे दोन, तीन किंवा पाच वर्षांसाठी) त्या दरापेक्षा दोन टक्के कमी दराने व्याज मिळते. पोस्टाच्या आवर्ती ठेव योजनेचा (रिकरिंग डिपॉझिट स्कीम) कालावधी पाच वर्षांचा आहे. आवर्ती ठेव योजना सुरू करून तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे खाते कधीही बंद करता येते. परंतु असे केल्यास बचत खात्याच्या हिशोबाने व्याज मिळते.

मंथली इन्कम स्कीम म्हणजे मासिक उत्पन्न योजना ही पोस्टाची आणखी एक लोकप्रिय योजना आहे. तिचा कालावधी पाच वर्षांचा असतो. ही योजना सुरू करून एक वर्ष पूर्ण झाले की कधीही ती बंद करता येते. खाते सुरू करून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि तीन वर्षे पूर्ण होण्याआधी जर खाते बंद केले, तर मूळ रकमेतून दोन टक्के रक्कम कापून घेतली जाते आणि उर्वरित रक्कम खातेदाराला दिली जाते. त्याचप्रमाणे खाते उघडल्यानंतर तीन वर्षांनी आणि पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वी जर ते बंद केले, तर मूळ रकमेतून एक टक्का रक्कम कापून घेतली जाते आणि उर्वरित रक्कम परत केली जाते. पीपीएफ म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना 15 वर्षांची आहे. परंतु जर खातेधारकाला, त्याच्या पतीला किंवा पत्नीला किंवा त्यावर अवलंबून असणार्‍याला दुर्धर आजार झाल्यास, खातेदारावर अवलंबून असलेल्यांच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत, खातेदार अनिवासी भारतीय झाल्यास पीपीएफ खाते पाच वर्षांनंतर बंद करता येते. अशा स्थितीत खाते सुरू केल्याच्या तारखेपासून बंद केल्याच्या तारखेपर्यंत व्याजात 1 टक्का कपात केली जाते.

सुकन्या समृद्धी योजनेत कमाल 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतरच बंद करता येते. अर्थात मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर जर तिचे लग्न झाले तर नॉर्मल प्रीमॅच्युअर क्लोजरची परवानगी आहे. याखेरीज खाते सुरू झाल्यानंतर पाच वर्षांनी काही विशिष्ट परिस्थितीत ते बंद करता येते. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास (मृत्यूच्या तारखेपासून पैसे देण्याच्या तारखेपर्यंत पोस्टाच्या बचत खात्याच्या हिशोबाने व्याजदर लागू राहील), खातेधारकाला गंभीर आजार झाल्यास, खातेधारकाच्या नावाने रक्कम गुंतविणार्‍या पालकाचा मृत्यू झाल्यास हे खाते मुदतीपूर्वी बंद करता येते. किसान विकासपत्र खाते काही विशिष्ट परिस्थितीत मुदतीपूर्वी बंद करता येते. संयुक्त खात्याच्या बाबतीत एका किंवा सर्व खातेधारकांचा मृत्यू झाल्यास, विकासपत्र गहाण ठेवले असल्यास राजपत्रित अधिकार्‍याकडून जप्त करण्यात आल्यास, न्यायालयाच्या आदेशानुसार, रक्कम जमा केल्याच्या तारखेपासून अडीच वर्षांनंतर हे खाते बंद करता येते. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची मुदत पाच वर्षांची आहे. तसे पाहायला गेल्यास राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र मुदतीपूर्वी मोडण्याची अनुमती नाही. परंतु खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, संयुक्त खात्याच्या बाबतीत एका किंवा सर्व खातेधारकांचा मृत्यू झाल्यास असे करता येते. याखेरीज राजपत्रित अधिकार्‍याने आणलेली जप्ती, न्यायालयाचे आदेश अशा परिस्थितीतही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची रक्कम मुदतीपूर्वी मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *