महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २४ – मुंबई – राज्यात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. पण लॉकडाऊन हा खरं तर शेवटचाच पर्याय असतो. त्यामुळे याबाबत सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. योग्य प्रतिसाद दिला नाही तर रेल्वेच्या बाबतीत योग्य तो विचार करावा लागेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिला.
आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, मला असे वाटते की, मुख्यमंत्र्यांनाच लॉकडाऊनचा अधिकार असतो. महाराष्ट्राच्या आरोग्याच्या हिताचा तसेच इतर परिणामांचा विचार करून ते आणि इतर वरिष्ठ मंडळी चर्चा करतील आणि ठरवतील. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चर्चा करून पत्र काढले आहे. ज्यामध्ये त्यांनी लोकांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर रेल्वेच्या बाबतीत योग्य तो विचार करावा लागेल असे सांगितले आहे. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेतील.
दोन-तीन दिवसांत निर्णय
राज्यातील नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचे गांभीर्याने पालन करावे, अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय घेण्याशिवाय पर्याय नसेल. आणखी दोन ते तीन दिवस पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांतील रुग्णवाढीची दिशा पाहून योग्य ते निर्णय घेतले जातील, असे राजेश टोपे म्हणाले.