खांदा दुखापतीने हा भारतीय फलंदाज आयपीएलमधून बाद ; ४ महिने घ्यावी लागणार विश्रांती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २५ – पुणे – मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर हा इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात जखमी झाला. त्याच्या खांद्याचे हाड सरकल्यामुळे सध्याच्या मालिकेत खेळू शकणार नाही. याशिवाय ९ एप्रिलपासून सुरू होत असलेल्या आयपीएलमध्येही तो खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले.

इंग्लंडच्या डावात आठव्या षटकात श्रेयसने शार्दूल ठाकूरच्या चेंडूवर जॉनी बेयरेस्टॉने मारलेला फटका रोखण्यासाठी सूर मारला होता. त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याने मैदानातून बाहेर जाताना विव्हळत होता. बीसीसीआय सूत्रांनी सांगितले की, ‘श्रेयसला शस्त्रक्रिया करुन घ्यावी लागेल. यामुळे तो पूर्ण आयपीएलला मुकेल. नेट्समध्ये परतण्यासाठी त्याला किमान चार महिन्यांचा कालावधी लागेल. त्याची दुखापत गंभीर आहे.’ काही दिवसांपूर्वीच इंग्लिश कौंटी संघ लँकशायरने अय्यरला करारबद्ध केले होते. कौंटी क्रिकेट मोसम २३ जुलैपासून सुरु होईल.

पंत, स्मिथ, अश्विन नेतृत्वाचे दावेदार
श्रेयसच्या अनुपस्थितीत आयपीएलमध्ये दिल्लीचे नेतृत्व करण्यास ऋषभ पंत, स्टीव्ह स्मिथ व अनुभवी ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन हे दावेदार मानले जात आहेत. कर्णधारपदासाठी सर्वात चांगला पर्याय अजिंक्य रहाणेचा असेल. त्याने यापूर्वी राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियात संधी मिळताच भारताला त्याने ऐतिहासिक जेतेपद मिळवून दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *