महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – पुणे : महात्मा गांधी रस्त्यावरील (एमजी रोड) फॅशन स्ट्रीटमध्ये खरेदीसाठी पुण्याबरोबरच बाहेरच्या तरुण ग्राहकांची सर्वाधिक पसंती होती. एमजी रोडवर बसणाऱ्या विक्रेत्यांचे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने २००० मध्ये अंतर्गत भागात सध्याच्या ‘फॅशन स्ट्रीट’मध्ये स्थलांतरित केले. कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने, चामडी व गृहपयोगी वस्तू अशा विविध प्रकारची दुकाने व स्टॉल्सनी ही बाजारपेठ गजबजली. मार्च २०२० मध्ये लॉकडाउन सुरू झाला. त्यानंतर इतर व्यवसायांप्रमाणेच इथल्या व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ पोचली. ही झळ सहन करीत काहींनी घरातील सोने गहाण ठेवून, तर काहींनी कर्ज काढून पुन्हा व्यवसायाला सुरूवात केली. तीन महिन्यांपासून व्यवसाय चांगला चालू लागला होता. त्यातच पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याची धाकधूक विक्रेत्यांमध्ये होती. त्यातच शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास फॅशन स्ट्रीटला आग लागली. त्या आगी बरोबरच तेथील विक्रेते, कामगारांचे जगणेही अक्षरशः रस्त्यावर आले.
लष्कर व कोंढवा परिसरात राहणाऱ्या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या, कामगारांच्या वर्षानुवर्षे उदरनिर्वाहाचे प्रमुख हक्काचे ठिकाण म्हणजे ‘फॅशन स्ट्रीट’. एक-दोन नव्हे, तर तब्बल अडीच हजार जण आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या सुमारे ८ ते १० हजार जणांचे जगणे त्या एकट्या बाजारपेठेवर अवलंबून होते. पण, शुक्रवारी लागलेल्या आगीत केवळ बाजारपेठच जळून खाक झाली नाही, तर त्यावर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबांच्या तोंडचा घासही हिरावून घेतला गेला.
या आगीमध्ये विक्रेत्यांचा लाखो रुपयांचा माल खाक झाला. जळालेल्या दुकानांमध्ये आता विक्रेत्यांच्या वस्तुंची केवळ भिजलेली राख, तुटलेले पत्रे, आडवे-तिडवे पडलेल्या पाईपांशिवाय काहीच दिसत नव्हते. दोन ते अडीच तासानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. फॅशन स्ट्रीटमध्ये ८०० हून अधिक दुकाने, स्टॉल्स आहेत. प्रत्येक दुकानात किमान पाच लाखांपासून ३० लाख रुपयांपर्यंतचा माल ठेवला जातो. त्यामुळे या आगीमध्ये किमान ८० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची शक्यता नावेद कुरेशी या विक्रेत्याने व्यक्त केली आहे. आगीमध्ये किती रुपयांचे नुकसान झाले, याबाबत आत्ताच सांगता येणार नसल्याचे अग्निशामक दलाने स्पष्ट केले.आग नेमकी कशामुळे लागली, याचे उत्तर अग्निशामक दलाकडून देण्यात आले नाही.