महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – पुदुक्कोट्टई – तामिळनाडूच्या विविध राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीपूर्वी श्रीलंकेतील कुख्यात दहशतवादी संघटना टायगर्स ऑफ तमिळ ईलमचा (एलटीटीई) संस्थापक वेलुपिल्लई प्रभाकरनची छायाचित्रे आणि पोस्टरसह प्रचार करताना पाहिले जाऊ शकते. मृत्यूच्या 12 वर्षांनंतरही प्रभाकरनच्या राज्याच्या राजकारणावरील प्रभाव कायम असल्याचे यातून स्पष्ट होते.
पुदुक्कोट्टई जिल्हय़ाच्या थिरुमयलम मतदारसंघातील नाम तमिलर काचीचे (एनटीके) उमेदवार शिवरमन यांनी प्रभाकरनचे छायाचित्र आणि कटआउटचा वापर केला आहे. राज्यसभा खासदार असलेले एमडीएमकेचे सेंथमीजहान सेमॅन यांनाही एलटीटीई प्रमुखाच्या कटआउटसह प्रचार करताना पाहण्यात आले आहे. याचबरोबर थोल थिरुमावलवन यांच्या नेतृत्वाखालील विदुथलाई चिरुथिगाल काची पक्षही प्रभाकरनच्या छायाचित्रांचा प्रचारामध्ये वापर कत आहे. प्रभाकरन याला 18 मे 2009 रोजी श्रीलंकेत ठार करण्यात आले होते.
एलटीटीई ही श्रीलंकेतील फुटिरवादी संघटना राहिली असून जी उत्तर श्रीलंकेत दीर्घकाळ सक्रीय होती. मे 1976 मध्ये एलटीटीईने हिंसक कारवाया सुरू केल्या होत्या. उत्तर आणि पूर्व श्रीलंकेत एक स्वतंत्र तमिळ देश स्थापन करणे हे संघटनेचे उद्दिष्ट होते.
श्रीलंकेच्या सैन्याने 18 मे 2009 रोजी मुल्लाईतिवू येथील एका गावात प्रभाकरन याचा खात्मा करत गृहयुद्ध संपविले होते. तीन दशकांपेक्षाही अधिक काळापर्यंत चाललेल्या संघर्षात किमान 1 लाख लोक मारले गेले होते. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वतःच्या कार्यकाळात श्रीलंकेत शांततेच्या प्रयत्नांसाठी भारतीय सैन्य तुकडय़ा पाठविल्या होत्या. पण एलटीटीईसोबतच्या संघर्षात भारताचे सुमारे 1200 जवान हुतात्मा झाले होते. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरंबदूरमध्ये एलटीटीईने आत्मघाती स्फोट घडवून आणत राजीव गांधी यांची हत्या केली होती.