रेल्वे मंत्रालयाने घेतला महत्वाचा निर्णय; रात्रीच्या वेळी मोबाईल-लॅपटॉप नाही करता येणार चार्ज

Spread the love

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. ३१ मार्च । रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधील मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगसाठीचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रात्रीच्या वेळी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंग पोर्टचा वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निर्णयाची माहिती दिली.

या निर्णयानुसार, रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत रेल्वेतील इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या चार्जिंग पोर्टचा वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता रात्रीच्या वेळी रेल्वेत मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाहीत. रात्रीच्या प्रवासाला निघण्यापूर्वी प्रवाशांना मोबाईल, लॅपटॉप पूर्ण चार्जिंग करून निघावे लागणार आहे. रेल्वेच्या पश्चिम विभागाने या निर्णयाची 16 मार्चपासून अंमलबजावणीही सुरू केली आहे.

रेल्वेचा हा निर्णय नवीन नाहीये, यापूर्वी 2014 मध्ये बंगळुरु-हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेसमध्ये आगीची घटना घडली होती. त्यानंतर रेल्वे मंडळाने सर्व झोनला रात्री ११ ते पहाटे पाच दरम्यान चार्जिंग्ज बंद करण्याची शिफारस केली होती. त्याची अंमलबजावणी आता होत असून रेल्वे बोर्डने आता सर्व विभागांना तसे आदेश दिले आहेत. “नुकत्याच झालेल्या आगीच्या घटना लक्षात घेऊन आवश्यक निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यापूर्वीही रेल्वे बोर्डाने असे आदेश जारी केले होते. मुख्य स्विचबोर्डवरुन रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत चार्जिंग पॉईंट्सची वीज बंद ठेवली जाईल”, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *