महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २ एप्रिल – गेल्या महिन्यापासून राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात तर कोरोना रुग्ण संख्येचा स्फोट झाला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन होणार की कठोर निर्बंध लागू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. (CM Uddhav Thackeray will address the state at 8.30 pm today)
राज्यात लॉकडाऊनची दुसरी लाट आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. राज्यात अनेक भागात लॉकडाऊन करण्यात आला आहे. काही ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. तरीही अनेक ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, आज दुपारी 4.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर कोरोना आढावा बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह आरोग्य विभागाचे विविध अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी संपूर्ण राज्यातील कोरोनाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे, अशा जिल्ह्यांचाही आढावा घेतला जाणार असून त्या जिल्ह्यांसाठी काही विशेष उपाय योजना करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.