महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ४ एप्रिल ।हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं आज निधन झालं. त्या ८८ वर्षांचं होत्या. आज ४ एप्रिल २०२१ रोजी दुपारी १२ वाजता शशिकला यांनी अखेरचा श्वास घेतला. हे दुखद वृत्त फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई यांनी सोशल मीडियावर दिली आहे.
बाॅलिवूडमध्ये ७० व्या दशकात शशिकला यांनी १०० चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री आणि खलनायिका अशा दोन्ही प्रकारच्या भूमिकाही त्यांनी साकारल्या होत्या. शशिकला यांचं पूर्ण नाव शशिकला जावळकर होतं. ४ ऑगस्ट १९३२ रोजी सोलापुरात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडिल मोठे उद्योगपती होते. शशिकला यांना एकूण ६ भावंडं होती.
केवळ वयाच्या ५ वर्षी शशिकला यांनी नृत्य, गायन व अभिनय सुरू केला. वडिलांचा उद्योग ढासळल्यानंतर शशिकला यांचं कुटुंब सोलापूरहून मुंबईस आलं होतं. दरम्यान, शशिकला यांची नूरजहाँसोबत भेट झाली. त्यानंतर त्यांना ‘झीनत’ या शौकत रिझवी (नूरजहाँचे पती) यांच्या चित्रपटात काम मिळालं. त्यांना चित्रपटात काम करण्याचे महिना ४०० रुपये मानधन मिळत होतं. नंतर निर्माते, पी. एन. अरोरा, अमिया चक्रवर्ती आणि व्ही. शांताराम यांनी शशिकला यांना चित्रपटात अनेक संधी दिल्या. वयाच्या २० वर्षी के. एल. सहगल कुटुंबातील ओमप्रकाश सहगल बरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना २ मुली झाल्या.