महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ४ एप्रिल ।राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. (weekend lockdown imposed in maharashtra)
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली. त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल. तो सोमवारी सकाळी संपले. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत. तसेच लॉकडाऊनची नियमावली उद्या रात्री 8 वाजता जारी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.