महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । सांगली । दि. ५ एप्रिल । राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे सरकार चिंतेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांचे एक वक्तव्य चांगलेच गाजत आहे. त्यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे वक्तव्य केले. तुमचे चेहरे पाहून कोरोना या जगातून गेला, असे मला वाटत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले होते. (Jayant Patil controversial statement in Pandharpur bypoll 2021)
मात्र, आता जयंत पाटील यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात येत आहे. पंढरपूर येथील झालेल्या जाहीर सभेमध्ये समोरच्या गर्दीतील अनेकांनी मास्क घातलेला नव्हता. त्यावर मी इतकेच म्हणालो की, तुमच्याकडे बघून जगात कोरोना नाही असेच वाटते. मात्र असे करू नका. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. दुपारी तीन वाजता मंत्रि मंडळाची बैठक आहे त्यामध्ये लॉकडाऊन करायचे, कडक निर्बंध घालायचे याबाबत निर्णय होणार आहे, असे मी म्हटल्याचा खुलासा जयंत पाटील यांनी केला.
मात्र, प्रसारमाध्यमांनी दिवसभर माझ्या पहिल्या दोन वाक्यांनाच जास्त प्रसिद्धी दिली. मी नंतर जे बोललो ते दाखवलेच नाही. त्यामुळे माझ्या वक्तव्याबाबत गैरसमज निर्माण झाला, असे जयंत पाटील यांनी सांगितले.