महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।नवीदिल्ली । दि. ५ एप्रिल । एप्रिल ।देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक आणि कोरोना लसीकरण मोहिमेशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला.
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना 5 सूत्री कार्यक्रम सांगितला आहे. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रिटमेंट, कोव्हिड नियमांचे पालन आणि लसीकरण जर संपूर्ण प्रामाणिकपणाने आणि बांधिलकीने राबविले गेले, तर या महामारीचा प्रसार थांबविण्यात प्रभावी ठरू शकतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
कोरोना स्थितीबद्दल चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की, कोरोनावर मात करण्यासाठी समुदाय जागरूकता आणि याचा सहभाग सर्वोपरी आहे. कोव्हिड -19 व्यवस्थापनासाठी लोकसहभाग आणि जनआंदोलन सुरू ठेवण्याची गरज आहे.
6 ते 14 एप्रिल दरम्यान देशभरात विशेष मोहीम
कोरोनापासून बचाव करण्यासाठी 6 ते 14 एप्रिल दरम्यान देशभरात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये लोकांना 100 टक्के मास्क वापरणे, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी / कामाच्या ठिकाणी स्वच्छता किती महत्त्वाची आहे याबद्दल माहिती दिली जाईल.