महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. ५ एप्रिल – राज्यात दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जाहिर करण्यात आला आहे. निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या, हा प्रश्न यंत्रणेसमोर आहे. या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. उद्या (6 एप्रिल) ही बैठक होणार आहे. या बैठकीला शिक्षण मंडळाचे अधिकारी उपस्थित असतील, असे सूत्रांनी सांगितले.
दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मेच्या दरम्यान होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे रोजी होणार असल्याचे यापूर्वी जाहीर झाले आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्रातील पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पास केले जाणार आहे. तर नववी ते अकरावीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.