किवींना टीम इंडियाचे ‘व्हाईट वॉश’चे टार्गेट

Spread the love

महाराष्ट्र २४- माऊंट मोनगानुई :गेल्या दोन सामन्यांत पराभवाच्या वाटेवरून पुनरागमन करत भारतीय संघाने विजय मिळवला होता. त्यामुळे पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात रविवारी भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध मालिका 5-0 अशी जिंकण्याचा प्रयत्न करेल. न्यूझीलंडने तीन किंवा त्याहून अधिक द्विपक्षीय टी-20 मालिकेतील सर्व सामने गमावलेले नाही. फेब्रुवारी 2008 मध्ये इंग्लंडच्या ‘अ’ संघाने त्यांचा 2-0 असा पराभव केला. भारतीय संघाने ही मालिका जिंकल्यास पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेनंतर पाचव्या स्थानावर राहील.

भारतीय कर्णधार विराट कोहलीचा प्रयत्न यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणार्‍या टी-20 विश्वचषक स्पर्धेकडे पाहता प्रयोग करण्याचा असणार आहे. चौथ्या टी-20 सामन्यात संजू सॅमसन व शिवम दुबे यांना उतरवण्याचा निर्णय चुकीचा ठरला.

सॅमसनला श्रीलंका व न्यूझीलंड संघाविरुद्ध निर्धारित षटकांमध्ये फलंदाजी क्रमवारीत सुरुवातीला पाठविण्यात आले. पण, त्याला संधीचा फायदा उचलता आला नाही. दुसरीकडे शिवम दुबेकडे जलदगती व फिरकी गोलंदाजांविरुद्ध फुटवर्क नाही. मनीष पांडे सहाव्या क्रमांकावर आपली जागा निश्चित करत आहे. तर, श्रेयस अय्यरला तिसर्‍या स्थानावर उतरवले जाऊ शकते.

आता प्रश्न यष्टिरक्षक फलंदाज जागेचा आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या घरच्या मालिकेत के. एल. राहुलने दुहेरी भूमिका बजावली होती. कर्णधार विराट कोहलीने तीन एकदिवसीय सामन्यात देखील राहुल यष्टिरक्षण करेल याचे संकेत दिले आहेत. राहुल चांगल्या फॉर्मात आहे. पण, संघ व्यवस्थापन त्याला आराम देऊन ऋषभ पंतला संधी देऊ शकतात.  लंकेविरुद्धच्या मालिकेला बराच अवकाश आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईमध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुखापतग्रस्त झाल्यानंतर पंतला संधी मिळाली नाही.

पीच रिपोर्ट : माऊंट मोनगानुई हे स्टेडियम हे उंचीवर असल्याने वेगाने वाहणारे वारे हा घटक महत्त्वाचा ठरतो. गोलंदाजांना एका बाजूने याचा उपयोग होतो, तर दुसर्‍या बाजूने त्रास होतो. खेळपट्टीवर चांगला बाऊन्स असून चेंडू चांगलाच कॅरी होतो. या मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या संघाच्या सरासरी 195 धावा आहेत. मैदानावर आतापर्यंत झालेले पाचही सामने पहिल्यांदा फलंदाजी करणार्‍या संघाने जिंकले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *