कोरोनाचे T20 वर्ल्ड कप वर सावट ; स्पर्धा होणार की नाही ? ICC कडून खुलासा

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ८ एप्रिल । जगभरात कोरोनाचे रुग्ण वेगानं वाढत आहेत. IPL पाठोपाठ आता टेस्ट चॅम्पियनशिप आणि T20 वर्ल्ड कपवरही कोरोनाचा सावट अधिक गडद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान भारतात टी 20 वर्ल्ड कप 2021 होणार आहे. त्याआधीही देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. IPLवरही कोरोनाचं संकट आहे. खेळाडूंपासून ते अगदी ग्राऊंड स्टाफपर्यंत कोरोना लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या 24 तासांत देशात 1.15 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत टी -20 वर्ल्ड कप भारतात आयोजित करण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या टी -20 वर्ल्ड कप सामन्यासाठी ICCकडून बॅकअप प्लॅन तयार करण्यात आला आहे.

ICCच्या वरिष्ठ अधिकाऱ्य़ांनी दिलेल्या माहितीनुसार अजून या बॅकअप प्लॅनवर काम सुरू करण्यात आलं नाही मात्र तो तयार असल्याचं सांगितलं आहे. सध्या त्यांची टीम भारतात नियोजित वेळेत T20 वर्ल्डकपचा सामना कसा योग्य पद्धतीनं पार पाडता येईल यावर काम करत आहे. सध्या ICCच्य़ा टीमचं लक्ष जून दरम्यान होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर आहे. ICCजवळ बॅकअप म्हणून UAE हा पर्याय आहे. सध्या IPLचे वारे वाहात आहेत. 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान IPLचे सामने होणार आहेत.

IPLनंतर 18 ते 22 जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडच्या साउथैम्प्टम इथे होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या आसपास साधारण टी 20 वर्ल्ड कपचा सामना होणार आहे. सध्या तरी असलेल्या नियोजनात आणि ठिकाणात कोणताही बदल करण्यात आला नाही. बॅकअप प्लॅन जरी असला तरी त्यावेळी काय परिस्थिती आहे हे पाहून पुढचे निर्णय घेण्यात येतील अशी माहिती ICCच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *