महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ९ एप्रिल । होळीनंतर शहरात उन्हाचा चटका वाढत होता. सातत्याने कमाल तापमानाचा पारा वाढत असल्याचे निरीक्षण हवामान खात्यात नोंदले जात होते. याच दरम्यान गुरुवारी ढगाळ वातावरणा झाल्याने उन्हाचा चटका कमी झाला. तापमान पाच अंशांनी घसरले हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार लगतचा भाग ते पूर्व विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी राज्यातील हवामानावर त्याचा परिणाम झाला असून, पुढील चार दिवस राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. बुधवारी ३९.५ अंश सेल्सिअसपर्यंत उसळलेला कमाल तापमानाचा पारा अवघ्या चोवीस तासांमध्ये ५.३ अंश सेल्सिअसने कमी होऊन ३४.२ अंश सेल्सिअस नोंदला. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारपर्यंत सूर्यदर्शनही झाले नव्हते. दुपारनंतर काही अंशी उन्हाची किरणे पडली. त्यामुळे कमाल तापमान सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअसने कमी झाले. मात्र, किमान तापमान २०.१ (१.४ अंश सेल्सिअसने जास्त) नोंदण्यात आल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.
राज्यात काही भागांत ढगाळ वातावरण झाले. यामुळे पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. शुक्रवारपासून (ता. ९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा दिला असून, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशाराही दिला आहे.