महाराष्ट्र संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने ? आज सर्वपक्षीय बैठक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१० एप्रिल ।महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत वेगाने भर पडत आहे. हे पाहता 10 दिवसांनंतर राज्यात 11 ते 12 लाख सक्रिय रुग्ण असतील. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याचा भार पेलवणार नाही, असे आरोग्य विभागाने राज्य सरकारला कळविले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना बोलावले आहे.

राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शनिवारी दुपारी होणार्‍या बैठकीनंतर ठाकरे सरकार लॉकडाऊनबाबत काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यात दररोज 50 ते 60 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात मागील 9 दिवसांपासून 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. सरकारने आरोग्य सेवासुविधा वाढवल्या असल्या तरी रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास ती सुविधा कमी पडणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. डॉक्टर, नर्सेस व इतर प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट तीव्र असून, अजून किमान महिनाभर तरी ती राहील, अशी भीती केंद्रीय पथकांनी व तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर पुढील 10-12 दिवसांनंतर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 ते 12 लाखांच्या घरात जाईल व त्या परिस्थितीत त्यांना आरोग्य सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यास आपण सक्षम नसू, असे बजावले आहे. त्यामुळे राज्य सरकारला कोरोना साखळी तोडण्यासाठी सध्या तरी तातडीचा उपाय म्हणून पूर्णत: लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, अशी चर्चा आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांशी सद्य:स्थितीबाबत चर्चा केली. यात एमपीएससी परीक्षा, विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा, सध्या लावण्यात आलेले कठोर निर्बंध, विकेंड लॉकडाऊन आदींसह राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यात आरोग्यमंत्री राजेश टोपे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह प्रमुख मंत्री व विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *