महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.१० एप्रिल । साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी यंदा सोने खरेदीचा मुहूर्त हुकण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत 30 एप्रिलपर्यंत सराफा पेढ्या व ज्वेलरी शोरूम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करणार्या ग्राहकांसह सराफांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, रिअल इस्टेट क्षेत्रामधून ग्राहकांना घर खरेदीसाठी विलोभनीय ऑफर्सचा भडिमार सुरू झाला आहे.
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईतील सराफांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या झवेरी बाजारात सध्या शुकशुकाट आहे. ग्राहक खरेदीसाठी येत असले, तरी सराफांच्या पेढ्या व शोरूम बंद असल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे. याउलट काही सराफांकडून चोरून व्यवसाय सुरू असल्याचेही शुक्रवारी पाहायला मिळाले.
मार्च महिन्यात सोन्याच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले. त्यात मार्च महिन्यातील अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. मात्र मुंबईसह राज्यात कोरोनाने उचल खाल्लेली असून जागतिक स्तरावरही कोरोनाची दुसरी व तिसरी लाट आलेली आहे. त्यामुळे भांडवली बाजार अस्थिर झाल्याने गुंतवणूकदारांनी आपला होरा सोन्यातील गुंतवणुकीकडे वळवला आहे. म्हणूनच सोन्याने पुन्हा एकदा प्रतितोळा 50 हजाराच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए)ने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याअखेरीस 45 हजार रुपये प्रतितोळा असलेले सोने 44 हजार 190 रुपयांपर्यंत घसरले होते. मात्र 1 एप्रिलपासून सोन्याच्या दरात वाढ सुरू झालेली असून 9 एप्रिलला सराफा बाजार बंद झाल्यानंतर एक तोळा सोन्याची किंमत 46 हजार 446 रुपयांपर्यंत पोहचली होती. अर्थात अवघ्या 9 दिवसांत सोन्याच्या दरात प्रतितोळा 2 हजार 256 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
गृहखरेदीसाठी ऑफर्सची लयलूट
लॉकडाऊननंतर सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीमुळे घर खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला होता. 1 एप्रिलपासून सरकारने महिलांच्या नावे घर नोंदणी करताना मुद्रांक शुल्कात 1 टक्क्याची सवलत दिली आहे.