ढगाळ वातावरण ; काही वेळातच पुण्यात धडकणार अवकाळी पाऊस; मराठवाडा , विदर्भ ला सतर्कतेचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. १० एप्रिल । आज महाराष्ट्रातील मराठवाडा, कोकण आणि विदर्भात गारपीटीसह जोरदार पाऊस येण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.

काही मिनीटांच्या अंतराने राज्यातील हवामानाचा कल बदलताना दिसत आहे. सध्या मुंबई, ठाणे, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे ढग घोंघावत आहेत. या परिसरात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस येण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण कोरडं राहणार असून विदर्भासहित, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण नोंदलं गेलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर काळे ढग दाटले आहेत. त्यामुळे काल कोकणातील काही भागासह पाचगणी आणि सातारा जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यानंतर हवामानाने आपला मोर्चा पुणे, मुंबई, ठाणे आणि उपनगराकडे वळवला असून या भागातही ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.

तर पुणे आणि साताऱ्याशिवाय उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, अहमदनगर आणि विदर्भासाठी पुढील तीन तास खुप महत्त्वाचे आहेत. पुढील तीन तासात या परिसरात वेगवान वाऱ्याच्या साथीनं विजेच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *