महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी। दि.१७ एप्रिल । मुंबई । देशात गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांवर गेली, पण देशात निवडणुकांचे मेळे आणि धार्मिक कुंभमेळे काही थांबायला तयार नाहीत. लाखो भाविक हरिद्वारला कुंभमेळय़ासाठी जमले. त्यांनी गंगेत शाहीस्नान केले. त्यातून कोरोनाचा संसर्ग देशभरात झाला आहे. प. बंगालातील निवडणुकांचे मेळे पंतप्रधान थांबवायला तयार नाहीत, तेथे कुंभमेळ्यातील साधू-संतांना तरी दोष का द्यायचा? अशा शब्दात मोदी सरकारवर सामनातून हल्ला चढवला आहे.
सामना अग्रलेखात म्हटले आहे की, ज्या राज्यांत निवडणुका झाल्या किंवा होत आहेत. तेथून किमान 500 पट वेगाने कोरोनाचा प्रसार देशभरात झाला. त्यामुळे कोरोना ही नैसर्गिक आपत्ती मान्य केली तरी या नैसर्गिक आपत्तीचा सूत्रधार राजकीय मनुष्यप्राणीच आहे. निवडणुका, राजकीय स्वार्थ यासाठी कोरोनाची पर्वा न करता दिल्लीश्वरांनी महामारीची लाटच निर्माण केली. देशात प्राणवायूचा तुटवडा आहे. रेमडेसिवीरची कमतरता आहे. बेडस्, व्हेंटिलेटर्स कमी पडत आहेत. शववाहिन्या व स्मशानात दाटीवाटी सुरू आहे. एकाच वेळी सामुदायिक चिता भडकावून कोरोनाग्रस्त शवांची विल्हेवाट लावली जात असताना मायबाप केंद्र सरकार प. बंगालात निवडणूक खेळात दंग आहे. केंद्र सरकारने या संकटसमयी तरी अहंकार आणि राजकीय लाभ-तोटय़ाचे गणित बाजूला ठेवून सगळय़ांशी खुल्या दिलाने चर्चा केल्या पाहिजेत.