महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.१९ एप्रिल । मुंबई ।सीबीएसईसह अन्य केंद्रीय बोर्डांनी दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर राज्यातील विद्यार्थी, पालकांचे लक्ष राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षांकडे लागले आहे. दहावीच्या परीक्षेबाबत निर्णय कधी घेतला जाईल याची प्रतीक्षा सर्वांना आहे. मात्र दहावीच्या परीक्षेवर तूर्तास कोणताच निर्णय न घेता ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेण्याचे ठरविण्यात आले आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सीबीएसईने घेतलेल्या निर्णयाचा अभ्यास करून काही तज्ञांशी चर्चा केली जाईल आणि त्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या परीक्षेबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले होते.
मात्र त्यानंतर शिक्षण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱयांनी तूर्तास राज्य मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्याने तोपर्यंत राज्यात आणि देशात कोरोनाची काय परिस्थिती असेल त्याचा आढावा घेतला जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे
.
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षण विभागाकडून आणखी महिनाभर वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली जाणार आहे. राज्यात दहावीची परीक्षा जूनच्या पहिल्या आठवडय़ात तर बारावीची मे महिन्याच्या अखेरीस होणार आहे. मात्र या परीक्षांवर सध्या कोरोनाचे सावट आहे. मात्र अद्याप परीक्षेला काही अवधी असल्याने कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर परीक्षांबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.