महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.१९ एप्रिल । नवीदिल्ली । देशभर लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घाईघाईने घेणार नाही. सध्या तरी घाईने लॉकडाऊन करावे अशी परिस्थिती दिसत नाही, असे स्पष्टीकरण पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिले. कोरोनाच्या दुसऱया लाटेने संपूर्ण देशभर थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीवेळी विचारलेल्या प्रश्नावर शहा यांनी हे उत्तर दिले.
केंद्राने गेल्या वर्षी जी तत्परता दाखवली होती ती आता कुठे गेली, असा सवाल शहा यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी विस्ताराने भूमिका मांडली. गेल्या वर्षी लॉकडाऊन केले त्यावेळचा उद्देश वेगळा होता. त्यावेळी आमच्याकडे कोणतेही औषध वा लस नव्हती. आता परिस्थिती वेगळी आहे. केंद्र सरकार सध्या तत्पर नाही असे नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करीत आहोत, दोन बैठकाही झाल्या. त्यावेळी मी हजर होतो. सर्वांच्या सहमतीने जे ठरेल त्याला अनुसरूनच आम्ही पुढे जाणार आहोत, परंतु घाईगडबडीने देशभर लॉकडाऊन लागू करावे अशी परिस्थिती सध्या दिसत नाही, असे शहा म्हणाले. कोरोना संसर्गाचा वेग प्रचंड आहे, पण विषाणूवर आपण नक्की विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.