महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.२२ एप्रिल । सोशल मीडियाच्या काळात ऑनलाईन शॉपिंग एक कॉमन बाब झाली आहे. कोरोनाच्या काळात तर अनेक जण घरबसल्या ऑनलाईन शॉपिंगला प्राधान्य देतात. परंतु सर्वांचाच ऑनलाईन शॉपिंगचा अनुभव चांगलाच आहे असं नाही. ऑनलाईन शॉपिंगदरम्यान अनेक गोष्टी लक्षात ठेवणं, सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं ठरतं, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता असते.
सीओडी कार्ड –
ऑनलाईन शॉपिंगवेळी कोणतीही वस्तू घेताना कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडता येतो. हा एक असा पर्याय आहे, ज्यात ग्राहक सामान हातात आल्यानंतर पेमेंट करू शकतात. पहिल्यांदा ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांसाठी कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) हा पर्याय चांगला आहे.
सेफ अकाउंट –
जर ऑनलाईन खरेदीसाठी कार्डचा वापर करत असाल, तर खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अकाउंट लॉगआउट करणं महत्त्वाचं ठरतं. बँक कार्डचा वापर करण्यापूर्वी कार्ड वेरिफाईड-बाय-वीजा किंवा मास्टरकार्ड सिक्योर कोडसह रजिस्टर्ड आहे का, हे चेक करा.
वेबसाईट कंपनी –
सोशल मीडियावर आकर्षक कपडे किंवा एखाद्या वस्तूचा फोटो दाखवून जाहिराती दाखवल्या जातात. अशात या वेबसाईटवर रजिस्टर्ड ऑफिसचा पत्ता, लँडलाईन नंबर आणि इतर माहिती दिलेली आहे का, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. कोणत्याही कंपनीच्या वेबसाईटवर त्यांची संपूर्ण माहिती नसल्यास, अशा साईटवरुन शॉपिंग करू नका.
क्वालिटी –
अनेक ऑफर्सच्या, डिस्काउंटच्या जाळ्यात अडकून अनेक युजर्स जुन्या स्टॉकमधील वस्तू खरेदी करतात. अशा जुन्या स्टॉकवर मोठ्या ऑफर्स दिल्या जातात. त्यामुळे कमी खर्चात वस्तू खरेदी करण्याच्या नादात, खराब क्वालिटीच्या वस्तू घेऊ नका.
ऑर्डर बुक करण्यापूर्वी –
ग्राहकांनी ऑनलाईन शॉपिंगमध्ये एसी, टीव्ही, फ्रीज, मायक्रोवेव अशा वस्तू खरेदी करताना त्यांची वॉरंटी पाहावी. ऑनलाईनद्वारे खरेदी करताना वॉरंटी आणि इतर सुविधा देण्यात आल्या आहेत, की नाही तेदेखील तपासून पाहावं.