राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल। मुंबई । कोरोनाचा वाढता संसर्ग आणि कठोर निर्बंधांमुळे राज्यातील सर्व १३ अकृषी विद्यापीठांतील सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी केली आहे. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही देतानाच कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्राध्यापक भरती सुरु करण्याचे आश्वासनही मंत्री सामंत यांनी दिले. राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत म्हणाले की, सध्या ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने परीक्षा सुरू होत्या. मात्र, आता कठोर निर्बंधामुळे ऑफलाइन परीक्षा शक्य होणार नाहीत. त्यामुळे आता उर्वरित सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय झाला असून ऑनलाइन परीक्षेसाठी विद्यापीठांनी तातडीने यंत्रणा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी १५ दिवसांत पुन्हा कुलगुरूंसोबत बैठक घेतली जाईल, असे सांगतानाच विद्यार्थ्यांनी विद्यापीठात गर्दी करू नये, असे आवाहनही सामंत यांनी केले. उच्च शिक्षण विभागातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत गणला जावा, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांना करणार आहोत. यामुळे निकाल लवकर लागेल. राज्यातील ३७ लाख कॉलेज विद्यार्थ्यांचे लसीकरण विद्यापीठांमार्फत करण्याचा विभागाचा मानस आहे. १८ ते २५ या वयोगटातील हे विद्यार्थी असल्याने त्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाशी चर्चा करणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. शिवाय, लसीकरणासाठी एनसीसी व एनएसएसच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य घेता येईल का, याबाबत संबंधित उपक्रमांच्या प्रमुखांशी चर्चा केली जाईल, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *