महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल। मुंबई । अमित लगस । राज्यात दुसऱ्या लाटेने एकीकडे नव्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना, बरे होणाऱ्यांची संख्या मात्र कमीच असल्याचे चित्र होते. शुक्रवारची आकडेवारी मात्र थोडी दिलासादायक आहे. एप्रिल महिन्यात प्रथमच नव्या बाधित होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आली आहे.
राज्यात शुक्रवारी दिवसभरात ६६ हजार ८३६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या मात्र ७४ हजार ४५ इतकी आहे. बाधित होणाऱ्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सुमारे सात हजारांपेक्षा जास्त आहे. या महिन्यात प्रथमच बरे होणाऱ्यांची संख्या अधिक असून, हा कल पुढील काही दिवस कायम राहिल्यास, राज्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण नक्कीच कमी होईल.
# शुक्रवारी बाधित झालेल्या ६६ हजार ८३६ रुग्णांमुळे बाधितांची संख्या ४१ लाख ६१ हजार ६७६ झाली आहे, तर दिवसभरात ७४ हजार ४५ रुग्ण बरे होऊन
घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ३४ लाख ४ हजार ७९२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
# यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.८१ एवढे झाले आहे. कोरोना मृत्युदर मात्र १.५२ टक्के इतका असून, दिवसभरात ७७३ करोना बाधित
रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
# आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५१ लाख ७३ हजार ५९६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४१ लाख ६१ हजार ६७६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या
राज्यात ४१ लाख ८८ हजार २६६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर
२९ हजार ३७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.