महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल। नवीदिल्ली । निखिल गाडे । कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्र्यांची बैठक बोलविली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना प्रोटोकॉल तोडल्यावरून चांगलेच सुनावले. त्यानंतर केजरीवाल यांनी हात जोडून माफी मागितली.
कोरोनासंदर्भातील बैठकीला सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत अरविंद केजरीवाल बोलत असताना तो संवाद रेकॉर्ड केला जात होता. ही बाब पंतप्रधानांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अशा खासगी संवादाचा प्रचार-प्रसार केला जात नाही. तुम्ही एक अतिशय महत्त्वाचा प्रोटोकॉल मोडला आहे, अशा शब्दांत मोदींनी सुनावले. त्यापनंतर केजरीवाल यांन हात जोडून पंतप्रधानांची माफी मागितली.
दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. मला दररोज फोन येतात, मी काय करावं? मी कोणाला फोन करावा? असे प्रश्न केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत उपस्थित केले. या बैठकीचे थेट प्रक्षेपण केजरीवाल यांच्यामार्फत सुरू होते. त्यावर मोदी यांनी नाराजी व्यक्त केली. ‘तुमची कृती आपल्या परंपरेच्या, प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी अशा बैठकीचं थेट प्रक्षेपण करणं प्रोटोकॉलला धरून नाही,’ असे सुनावले.
त्यांतर केजरीवाल यांनी आपली चूक झाल्याचे सांगत ‘पुढील वेळेपासून मी याची काळजी घेईन. माझ्याकडून चूक झाली असेल, मी काही कठोरपणे बोललो असेन, तर मी त्यासाठी माफी मागतो,’ असे म्हणत हात जोडले.